लोकलायझेशन : तुमची अनिवार्य गरज

तुमचे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी लोकलायझेशन हे आवश्यक माध्यम असून ती जागतिक अर्थव्यवस्थेची गरज आहे. वेगवेगळ्या मार्केट रिसर्चमधूनही हे सिद्ध झाले आहे.

जगात ५००० पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. यापैकी बहुतेक भाषांना त्यांच्या स्वतंत्र लिपीमध्ये लिहल्या जातात ,तर काही भाषांमध्ये अनेक बोलीभाषा आहेत. एखाद्या विशिष्ट समुहामध्ये या भाषेचा बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी वापर होतो. दूरच्या प्रदेशाशी संपर्क साधणे ही पूर्वी दुर्मिळ बाब मानली जात असे, त्यामुळे या भाषांवर भौगोलिक बंधने होती. मात्र सध्याच्या अत्याधुनिक जगात, विशेषत: दळणवळण आणि दूरसंचार क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे जग हे खऱ्या अर्थाने ‘हे विश्वचि माझे घर’ झाले आहे.

२०१०-२०१८ या कालावधीत आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि मध्य-पूर्व देशांमध्ये प्रादेशिक भाषेत इंटरनेटचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत १००० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. (१) याचा सोप्या भाषेत अर्थ सांगायचा झाला, तर या कालावधीत अब्जावधी वापरकर्ते ऑनलाइन आले. इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेलेले हे वापरकर्ते ही एक मोठी बाजारपेठ आहे. इंग्रजीशिवाय अन्य भाषा बोलणारा हा मोठा समूह आहे. त्यांच्या भाषांमध्ये विविधता आहे. भाषांमधली ही विविधता हे  बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोरचे मोठे आव्हान आहे. जग हे एकमेकांच्या जवळ येत असताना या मोठ्या समूहाशी त्यांच्या भाषेत संवाद कसा साधायचा? हा प्रश्न या कंपन्यांना सतावत होता.

इंटरनेटने एकमेकांशी जोडल्या गेलेल्या या बाजारपेठेतील बहुतेक प्रदेश हे ब्रिटीश साम्राज्याचा हिस्सा होते. त्यामुळे, येथील अनेक नागरिकांना (बाजारपेठेच्या भाषेत ग्राहकांना) इंग्रजीची किमान समज होती. त्यामुळे आपल्या उत्पादनाची भाषा इंग्रजी ठेवायची की त्याचे स्थानिक भाषेत रुपांतर ( लोकलायझेशन) करायचे? या कंपन्यांच्यासमोर हा एक मोठा पेच होता. ही भाषा इंग्रजीमध्ये ठेवणे अगदीच चुकीची कल्पना नक्कीच नव्हती.कारण त्यामुळे कंपनीची आपल्या आशयावरची  पकड घट्ट राहणार होती. त्यामुळे इंग्रजीचे स्थानिक भाषेत रुपांतर होताना होणारे बदल टाळता येतात. तसेच या आशयाचे स्थानिक भाषेत रुपांतर करण्यासाठी लोकलायझेशन टीमलाही नियुक्त करण्याची गरज नाही. असे असले, तरी एखाद्या उत्पादनाचे लोकलायझेशन केल्यास अधिक फायदा होऊ शकतो. कसं? ते आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

ग्राहक स्थानिक भाषेला प्राधान्य देतात का?

एखाद्या उत्पादनाची माहिती आणि ऑनलाइन UI जर स्थानिक भाषेत असेल, तर ग्राहक ते उत्पादन खरेदी करण्यास अधिक प्राधान्य देतात ही बाब अभ्यासातून (२) समोर आली आहे. इतकेच नाही, तर कमी किंमतीच्या उत्पादनापेक्षा अधिक किंमतीच्या उत्पादनाच्या खरेदीसाठी ही बाब विशेष महत्त्वाची आहे असे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. एखादे महागडे उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्या उत्पादनाची माहिती स्थानिक भाषेत वाचण्यात ग्राहकांना अधिक रस असतो.

याच विषयावरचे आणखी एक संशोधन इटलीमध्ये करण्यात आले होते(३). यामध्ये इटालियन विद्यार्थ्यांसमोर इंग्रजी आणि इटालियन भाषेत माहिती असलेले उत्पादन ठेवण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी इटालियन भाषेत माहिती असलेल्या उत्पादनाच्या खरेदीला अधिक पसंती दिली. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीची उत्तम समज आहे अशा विद्यार्थ्यांमध्येच हा प्रयोग करण्यात आला होता, ही गोष्ट इथे विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. इतकेच नाही, तर ग्राहकांची विभागवार वर्गवारी करण्यात, तसेच त्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्यासाठीही स्थानिक भाषेचा अधिक उपयोग होतो, हे देखील या अभ्यासामधून स्पष्ट झाले आहे.

Gallup (४) ने केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ५६ टक्के ग्राहक एखादे उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्याची माहिती स्थानिक भाषेतील वेबसाइटवर वाचतात. त्यामुळे निम्यापेक्षा जास्त ग्राहक हे स्थानिक भाषेला पसंती देतात हेच या सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.

मलेशियामध्येही या विषयाचा सखोल अभ्यास (५) करण्यात आला. आरोग्य विमा उत्पादनांच्या खरेदीसाठीही ग्राहकांनी स्थानिक भाषेतील जाहिरातींना अधिक पसंती दिल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले.

स्थानिक भाषा का महत्त्वाची आहे?

एखाद्या उत्पादनाला ग्राहकांशी जोडण्यात आणि त्यांच्यामध्ये त्याबाबत विश्वास निर्माण करण्यात स्थानिक भाषेचे मोठे योगदान असते. ग्राहकांचा हाच विश्वास या ब्रँडची इमेज तयार करण्याकरता उपयोगी ठरतो. या विषयावर झालेल्या वेगवेगळ्या अभ्यासांमधूनही ही बाब अधोरेखित झाली आहे.

ग्राहकाचे एखाद्या उत्पादनाबाबतचे मत निश्चित करण्यासाठी भाषा ही एक महत्त्वाची बाब आहे. स्थानिक भाषेचा वापर हा कंपनीच्या महसूलातील एक निर्णायक घटक ठरतो. त्यामुळे, जागतिक बाजारपेठेत ग्राहकांचा विचार करताना स्थानिक भाषेचा वापर ही बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी आवश्यक बाब बनली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल’ होण्याचे स्वप्न यामधून साकार होऊ शकते. स्थानिक बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन आपल्या उत्पादनाचे लोकलायझेशन करणे आवश्यक आहे ही बाब अनेक कंपन्यांना पटली आहे. त्यामुळेच, जागतिक मंदीच्या बिकट कालखंडाची झळ लोकलायझेशन उद्योगाला बसली नाही.

लोकलायझेशनचे महत्त्व अनेकांनी ओळखले आहे. त्याचा फायदाही अनेकांना होतो आहे. विविध भाषा बोलणाऱ्या ग्राहकांपर्यंत तुमचे उत्पादन पोहचवणाऱ्या या लोकलायझेशनपासून तुम्ही किती दिवस दूर राहणार?

संदर्भ

[1] https://www.internetworldstats.com/stats.htm

[2] Can’t Read, Won’t Buy: Why Language Matters on Global Websites By Donald A. DePalma, Benjamin B. Sargent, and Renato S. Beninatto September 2006

[3] Cross-Cultural Consumer Behavior: Use of Local Language for Market Communication—A Study in Region Friuli Venezia Giulia (Italy) by Franco Rosa, Sandro Sillani & Michela Vasciaveo
Pages 621-648 | Journal of Food Products Marketing Volume 23, 2017 – Issue 6

[4] User language preferences online; Survey conducted by The Gallup Organization, Hungary upon the request of Directorate-General Information Society and Media

[5] The Influence of Language of Advertising on Customer Patronage Intention: Testing Moderation Effects of Race Muhammad Sabbir Rahman, Fadi Abdel Muniem Abdel Fattah, 1 2
Nuraihan Mat Daud and Osman Mohamad ; Middle-East Journal of Scientific Research 20 (Language for Communication and Learning): 67-74, 2014

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *